सर्जाराजाच्या साजाला महागाईची झळ
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव : शेतकऱ्याच्या श्रमांचा सखा असलेल्या बैलाला कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा.अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या या सणाच्या पार्श्वभूमीवर मारेगावच्या आठवडी बाजारात प्रचंड गर्दी उसळली होती. रंगीबेरंगी साज-सामानांनी बाजार खुलून दिसत असला तरी महागाईच्या झळेमुळे यंदा सर्जाराजाचा साज महागला आहे.
दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवारला होणाऱ्या बैलपोळ्याच्या निमित्ताने बाजारपेठेत वेसन, पैंजण, झूल, बेगड, मोरके, कवडी, घंटा, आंबी हळद, पिंपळपान, सडे, चौरंग आदी साजसामानांची दुकाने मोठ्या प्रमाणावर उभी राहिली. चौफेर रस्त्यांवर रंगीबेरंगी साहित्य पाहण्यासाठी व खरेदीसाठी शेतकऱ्यांसह नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली.

शेतकरी वर्षभर आपल्या बैलाबरोबर राबतो. त्याच्या या जिवलग साथीदाराला सजविण्यासाठी शेतकऱ्यांची चढाओढ सुरू होती. बाजारात हिरव्या भाज्यांसह पोळ्यासाठी लागणारे साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंमुळे बाजारपेठ फुलून गेली होती.
मात्र, महागाईच्या फटक्याने यंदा शेतकऱ्यांचा खिसा अधिकच पातळ झाला आहे. साजाच्या प्रत्येक वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सजावटीचा खर्च दुप्पट झाला आहे. तरीदेखील सणाच्या उत्साहात कोणतीही कमतरता नसून पोळ्याच्या सणाची चाहूल बाजारातून स्पष्टपणे जाणवत आहे.


