चिंचघाट गावात शोककळा
ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
झरी-जमणी तालुक्यातील चिंचघाट येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. चिंचघाट येथील प्रल्हाद नामदेव डुकरे (वय ६१) या शेतकऱ्याचा आज सकाळी शेतात काम करत असताना सर्पदंशाने मृत्यू झाला.
प्रल्हाद डुकरे शेतात नियमित काम करत असताना अचानक सर्पदंश झाला. तात्काळ ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही.

या दुर्दैवी घटनेमुळे चिंचघाट गावात शोककळा पसरली आहे. शेतकरी प्रल्हाद डुकरे हे कुटुंबाचा आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंब उघड्यावर आले असून पत्नी, मुलगा, सून, नातवंड असे निकटवर्तीय मागे राहिले आहेत.
गावकऱ्यांनी शासनाकडे या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.दरम्यान, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबरोबरच आता सर्पदंशासारख्या घटनांमुळे शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


