सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव : सोयाबीन पिक वाढीच्या आणि फुलोऱ्या अवस्थेत असताना पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे ‘पिवळ्या मोझक’ रोगाचा धोका वाढल्याचे शेतकऱ्यांनी नोंदवले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत मारेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांना याबाबत सतर्कता ठेवण्याचे आवाहन केले आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, पांढरी माशी या रोगाची वाहक असून तिच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडतात, गळतात, फुलोरा कमी होतो, शेंगा गळतात आणि उत्पादनात मोठी घट होते. उष्ण तापमान, दमट वातावरण आणि दोन पावसांतील खंड हे रोगाच्या प्रसारासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात.

उपाययोजना:
रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.पिवळे चिकट सापळे एकराला ६–४ प्रमाणात लावावेत.५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
कीटकनाशकांसारखे एसेटामिप्रिड + बायफेन्थ्रीन, थायामेथोक्झाम, फ्लोनिकामाइड किंवा इमिडाक्लोप्रीड आळीपाळीने फवारणी करावी.
सिंथेटिक पायरेथ्रोइड गटातील औषधे मर्यादित प्रमाणात वापरावीत.
तालुका कृषी अधिकारी कु. दिपाली खवले यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, “सोयाबीन पिकात पिवळ्या मोझक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.”


