शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून चिंचमंडळ परिसरात शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. परिणामी कापूस, सोयाबीन, तुरीसह हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
शनिवारी (दि. 13 सप्टेंबर) सकाळपासूनच चिंचमंडळ परिसरातील शेतजमिनींमध्ये पाणी साचलेले दिसून आले. अनेक ठिकाणी उभ्या पिकांवर पाण्याची चादर पसरल्याने शेतकऱ्यांची महिनोंमहिन्यांची मेहनत वाया गेली आहे.
दरम्यान, वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील नाल्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने शेतशिवार जलमय झाले. यामुळे शेतकरी हताश झाले असून पुढील दिवसांत उपजीविकेवर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी केली आहे. वेळेत मदत न मिळाल्यास मोठ्या संख्येने शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे.


