गोंडबुरांडा येथील शिक्षिका जयश्री प्रकाश जाधव यांना ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव : यवतमाळ जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा परिषद यवतमाळ आणि ओपन लिंक फाउंडेशन यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या “आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम” (विनोबा ॲप) अंतर्गत ऑगस्ट महिन्याचा जिल्हास्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार जि.प. उ.प्राथमिक शाळा, गोंडबुरांडा (ता. मारेगाव) येथील शिक्षिका कुमारी जयश्री प्रकाश जाधव यांना प्रदान करण्यात आला.
जिल्ह्यातील पाच उपक्रमशील शिक्षकांमध्ये कू.जाधव यांचा समावेश असून, त्या मारेगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव शिक्षिका आहेत.या प्रसंगी कू. जाधव यांचा सन्मान जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) आणि जिल्हा उपशिक्षण अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यांच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे आणि विद्यार्थ्यांसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांना अभिनंदनाचे संदेश दिले गेले.

गौरव प्राप्त केल्याने तालुक्यातील इतर शिक्षकांना अध्यापनात नवनवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळेल, तसेच शिक्षणाच्या गुणवत्तावृद्धीला चालना मिळेल, असे मान्यवरांनी सांगितले.


