“माझं कुंकू – माझा देश”च्या घोषणांनी वणी दणाणलं

0
71

शिवसेना (उ.बा.ठा.) महिला आघाडीचं पाकिस्तानविरोधी आंदोलन

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क डेस्क,वणी

वणी : भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना खेळविण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीने सोमवारी वणी शहरात जोरदार आंदोलन छेडले. “माझं कुंकू – माझा देश” अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून गेला.

या आंदोलनाचं नेतृत्व किरणताई देरकर व जिल्हा महिला प्रमुख योगिताताई मोहोड यांनी केलं. मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांनी बीसीसीआय सचिव जय शाह आणि केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलना दरम्यान संतप्त महिलांनी १०२० कुंकवाच्या डब्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवून निषेध नोंदवला.

यावेळी किरणताई देरकर यांनी प्रतीकात्मक संताप व्यक्त करत चौकात टीव्ही फोडला. त्यानंतर बॅट, बॉल आणि स्टम्प जाळून पाकिस्तानविरोधी घोषणांनी वातावरण तापवले.

महिला आघाडीच्या नेत्या म्हणाल्या, “पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असताना देखील भारत–पाकिस्तान सामना खेळणे म्हणजे शहीद सैनिकांच्या विधवांचा अपमान आहे.

सरकारने या बहिणींच्या भावनांचा क्रूर छळ केलेला असून याची किंमत सरकारला चुकवावी लागणार आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.या आंदोलनामुळे वणी शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शिवाजी महाराज चौकात महिलांच्या घोषणा व पाकिस्तानविरोधी आंदोलनामुळे परिसर दणाणून गेला.

आंदोलनात महिला उपजिल्हा संघटिका डिमन ताई टोंगे, सरपंच गीताताई उपरे, इंदुताई किन्हेकर, सरपंच रूपालीताई कातकड़े, सुरेखाताई ढेंगळे, सुरेखाताई भोयर, पौर्णिमाताई राजुरकर, सविता ताई आवारी, सुनंदा ताई गुहे, शारदा चिंतकुंतलवार, रेखा बोबड़े, अर्चना पिदुरकर, पौर्णिमा भोंगळे, जिजाताई वरारकर, अरुणा कूचनकार, अमीना पठाण, यमुना हिरादेवर, रजनीताई टोंगे, किर्तीताई देशकर, संध्याताई कोकास, प्रगती घोटेकर, सीमा बालगोनी, शुभांगी ठाकरे आदींसह वणी-झरी-मारेगाव तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here