२२ सप्टेंबरपासून अन्नत्याग उपोषणाचा इशारा
ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
झरी जामणी – मुकुटबन येथील आरसीसीपीएल एमपी बिरला कंपनीविरोधात स्थानिक दिव्यांग बांधव आणि प्रकल्पग्रस्त विधवा महिलांनी विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. नायब तहसीलदार नरेंद्र थोटे यांना निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास २२ सप्टेंबर २०२५ पासून गेट क्रमांक २ समोर आमरण अन्नत्याग उपोषणास सुरुवात करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मागण्यांमध्ये मुकुटबन, अडेगाव, येडसी, बैलमपूर, गाडेघाट, राजूरगोटा, पिंपरडवाडी, मांगली, हिरापूर, अर्धवण येथील दिव्यांग व विधवा महिलांना सीएसआर निधीतून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, अपघातग्रस्त कामगारांना नुकसानभरपाई देणे तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्रांना NAPL पेरोलवर कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करणे या प्रमुख मागण्या आहेत.
या निवेदनावेळी काँग्रेस युवा तालुका अध्यक्ष राहुल धांडेकर, शिवसेना तालुका संघटक दायकर गेडाम, सागर इंगोले, संभा परशिवे व रघुनाथ पवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
दिव्यांग बांधव व विधवा महिलांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे मुकुटबन परिसरात संतापाची लाट उसळली असून कंपनी प्रशासनाने पुढील भूमिका काय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


