सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव:हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक ठरत समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आदर्श देखावा उभारणाऱ्या समाज सेवा बाल गणेश मंडळ, मारेगाव या मंडळाची यंदा जिल्हा स्तरावरील आदर्श गणेश मंडळ स्पर्धा साठी निवड झाली आहे.

समाज सेवा मंडळाच्या गणेश मुर्तीची स्थापना युसुफ शेख अब्दुल यांच्या नेतृत्वाखाली झाली असून मंडळात हिंदू-मुस्लीम महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. गणेशोत्सव काळात मंडळाने विविध समाजहिताचे उपक्रम राबवले. ३ सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय, मारेगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.

दि.७ सप्टेंबर रोजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. गणेशोत्सव काळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून काटेकोर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. दारू व नशाविरोधी जनजागृतीही केली गेली.

पर्यावरण पूरक उपक्रमामध्ये स्थापना व विसर्जनावेळी डी.जे.चा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा उपयोग करण्यात आला. या उपक्रमांच्या आधारे मंडळाने स्पर्धेचे सर्व निकष पूर्ण केले असून जिल्हा स्तरावरील निवड निश्चित झाली आहे.

दरम्यान, निवड झालेल्या मंडळांचा बक्षीस वितरण समारंभ उद्या दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, प्रेरणा हॉल, पोलीस मुख्यालय, यवतमाळ येथे होणार आहे.


