स्वच्छता ही सेवा अभियानास मारेगावात प्रारंभ

0
299

नगरपंचायत सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन

“जनसहभाग मिळाल्यास अभियान होईल लोकचळवळ” – मुख्याधिकारी बाबर

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव:शासनाच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ आज नगरपंचायत सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की होते. यावेळी मा.उपाध्यक्षा हर्षा महाकुलकर, मारेगाव तहसीलचे नायब तहसीलदार महेश रामगुंडे, पोलीस निरीक्षक शाम वानखेडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नगरपंचायतचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर (मशप्रसे), नगरसेवक हेमंत नरांजे, नगरसेविका अंजुम शेख व छाया किनाके यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमात मुख्याधिकारी बाबर यांनी आगामी पंधरवड्याचे नियोजन मांडले. या काळात आरोग्य शिबीर, स्वच्छता रॅली, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. विशेष म्हणजे 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या घोषवाक्यासह सामूहिक स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सूत्रसंचालन राधिका देशमुख (कर निरीक्षक) यांनी केले तर आभार प्रदर्शन कविता किनाके (आस्थापना प्रमुख) यांनी मानले.

“जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा”

“स्वच्छता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे शहरवासीयांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांचा सहभाग मिळाल्यास हे अभियान लोकचळवळ ठरेल, अशी मला आशा आहे.”
— शशिकांत बाबर (मशप्रसे), मुख्याधिकारी, न. पं. मारेगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here