नेहारे सरांच्या कार्याचा गावकऱ्यांनी घेतला उजाळा
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील सालईपोड जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा येथील शिक्षक श्री. विलास नेहारे यांची बदली झाल्याने गावकऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. गावात आयोजित निरोप समारंभात शिक्षकांचा सत्कार करून त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

शाळेत व गावात गेल्या २५ वर्षांत नेहारे सरांनी घेतलेली मेहनत, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न व गावात निर्माण केलेले शैक्षणिक वातावरण याची उजळणी समारंभात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना “सर आमच्यासाठी फक्त शिक्षक नव्हते, तर मार्गदर्शक आणि मित्र होते,” असे सांगितले.

गावकऱ्यांनी सरांच्या कार्याचे कौतुक करत “सरांनी आमच्या मुलांना शिक्षणाबरोबरच शिस्त, संस्कार आणि आत्मविश्वास दिला. त्यांचे योगदान गाव विसरणार नाही,” अशी भावना व्यक्त केली.

समारंभात सरांचा शाल, फुलमाला व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी महिला मंडळ, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमुखाने सरांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.


