भालेवाडी येथे शेतकरी व मजुरांची मोठ्या संख्येने उपस्थिती
सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव : तालुक्यातील भालेवाडी (सरोदी पोड) या मजूर बहुल गावात सुरक्षित फवारणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुका कृषि अधिकारी कार्यालय, पंचायत समिती व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. १९ सप्टेंबर) संपन्न झालेल्या या शिबिरात शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणीसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी कीटकनाशकांचे दुष्परिणाम व त्यावरील उपाय सांगितले. मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी फवारणी करताना घ्यावयाची काळजी व योग्य कीटकनाशक निवडीबाबत माहिती दिली. तर कृषि अधिकारी संदीप वाघमारे यांनी सुरक्षा किटचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना जागरूक केले.

आरोग्य विभागाचे जूनघरे यांनी कीटकनाशकांचा शरीरावर होणारा परिणाम याबाबत हितगुज केले. गावचे प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधी अंकुश मापूर यांनी कृषि विभागाच्या या उपक्रमाचे समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांना सुरक्षा किटचा वापर करण्याचे आवाहन केले.
शिबिरादरम्यान आरोग्य विभागातील आवारी मॅडम व तेजस्विनी चंदनखेडे यांनी सर्व शेतकरी व शेतमजुरांची तपासणी करून योग्य वैद्यकीय सल्ला दिला. यावेळी शेतकरी व शेतमजुरांना मोफत फवारणी किटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकृषि अधिकारी विनायक जुमनाके यांनी केले तर आभार प्रदर्शन सहायक कृषि अधिकारी प्रविण कचाटे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी उपकृषि अधिकारी ज्ञानेश्वर गाडगे, सहायक कृषि अधिकारी निखिल पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.


