सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव : तालुक्यातील गोधणी येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्या मार्फत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया-गळीतधान्य) अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी कृषि विभागाच्या विविध योजना तसेच फळबाग लागवडीबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी कापूस व सोयाबीन पिकांवरील एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महाविस्तार एआय अँप विषयी प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
सहायक कृषि अधिकारी तुषार मेश्राम यांनी कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिले. प्रधानमंत्री कृषि अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे जिल्हा संसाधन व्यक्ती श्यामल राऊत यांनी अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती दिली तसेच शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल पवार यांनी केले, तर उत्कृष्ट आयोजन व आभार प्रदर्शन सचिन आत्राम यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमास सहायक कृषि अधिकारी सनथ घोसळकर यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


