सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव: यवतमाळ येथील वाधवाणी महाविद्यालयात दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोज शनिवारला पार पडलेल्या जिल्हास्तरीय पावसाळी व्हॉलीबॉल स्पर्धेत कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मारेगावच्या मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावत जिल्ह्यात आपला ठसा उमटवला. या शानदार विजयामुळे मारेगावचा संघ आता विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
स्पर्धेत सुरुवातीपासूनच मारेगाव महाविद्यालयाचा संघ अचूक सर्व्हिस, नेटवरील प्रभावी ब्लॉकिंग आणि भक्कम बचावाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना रोखत राहिला. अंतिम सामन्यात त्यांनी राळेगाव संघाचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत निर्णायक विजय मिळवला.

या यशामागे क्रीडा शिक्षक प्रा. महादेव हेलगे व प्रा. संगीता आवारी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. प्राचार्य हेमंत चौधरी यांचे प्रोत्साहन व सहकार्यही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. विजयानंतर संस्थेचे अध्यक्ष मा.नरेंद्र पाटील ठाकरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे तसेच प्राचार्य चौधरी यांनी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
प्राचार्य चौधरी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात क्रीडांगणासह आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. शैक्षणिक सोबतच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. या विजयामुळे महाविद्यालयाचा क्रीडा लौकिक अधिक उज्वल झाला आहे. विभागीय स्पर्धेतही आमचे विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करतील, असा मला विश्वास आहे.”
या विजयाने मारेगाव महाविद्यालयाचा क्रीडा लौकिक आणखी वृद्धिंगत झाला असून परिसरात जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. विजयी संघ आता विभागीय पातळीवर चमक दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.


