सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव : जळका येथील आनंद बाल सदनातून दिनांक २२ सप्टेंबर रोजी एक नववर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. अवघ्या २४ तासांच्या आत मारेगाव पोलिसांनी त्या मुलाचा यशस्वी शोध लावून त्याला सुरक्षितपणे ताब्यात दिले आहे.
बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव रुद्रा आकाश राठोड (रा. खडबडा मोहल्ला, रंगनाथ नगर, वणी, जिल्हा यवतमाळ. सध्या मुक्काम – आनंद बाल सदन, जळका) असे आहे. तक्रार दाखल होताच मारेगाव पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम सुरू केली. तपासादरम्यान सदर मुलगा वणी येथील त्याच्या आजी कडे (नीला रामजी राठोड) गेला असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर पोलिसांनी त्या मुलाला शोधून आनंद बाल सदनचे काळजीवाहक मोहन महादेव उईके(तक्रारदार) व शाळेचे मुख्याध्यापक यांच्या ताब्यात सुरक्षितरीत्या सोपविले.
या यशस्वी कामगिरीत उपविभागीय पोलीस अधिकारी (वणी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक किसन संकुलवार, पोहेका. रजनीकांत पाटील व पोलीस कर्मचारी संभा लेनगुडे यांनी मोलाची भूमिका बजावली.
स्थानिक नागरिकांकडून या तात्काळ कार्यवाहीबद्दल मारेगाव पोलिसांचे कौतुक होत आहे.


