सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव : नगरपंचायतीच्या वतीने आज (दि. 23 सप्टेंबर) शहरात भव्य स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत नागरिक, विद्यार्थी व विविध संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रॅलीचे प्रमुख उद्दिष्ट नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे तसेच 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या “एक दिवस, एक तास, एक साथ” या उपक्रमाचा प्रचार करणे हे होते.
या रॅलीत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर, अधिकारी-कर्मचारी, नगरसेविका अंजुम शेख, छाया किनाके यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. जिल्हा परिषद शाळा व इतर शाळांच्या विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला.

रॅलीची सांगता नगरपंचायतीत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करून झाली. स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता शहरात सामूहिक स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.
“या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन शहर स्वच्छतेत योगदान द्यावे,” असे आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांनी केले.


