सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव : तालुक्यातील वेगाव येथील अल्पभुधारक शेतकरी श्री. योगेश्वर कापसे व सौ. सुलोचना कापसे यांच्या मुलांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, अमरावती येथील गोकुल धाम गोरक्षण संस्था येथे मात्रु-पित्रु अखरपोक सणाचे औचित्य साधून त्यांच्या मुलगा हर्षदिप कापसे याचा गुणगौरव शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कठीण परिस्थितीचा सामना करत आईवडिलांनी शिक्षणाला प्राधान्य दिले. शेतीसोबतच ग्रामरोजगार सहाय्यक म्हणूनही श्री. योगेश्वर कापसे यांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या तिन्ही मुलांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे.

त्यातील मोठ्या मुलीने बारामती येथे शिक्षणात उत्कृष्ट गुण मिळवले. धाकट्याने चंद्रपूर येथील साई महाविद्यालयातून DAMLT कोर्स पूर्ण करून पहिला क्रमांक मिळवला व महाविद्यालयीन स्तरावर सत्कारही झाला.नुकताच अमरावती येथे हर्षदिप कापसे याचा पशुवैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल कापसे कुटुंबाचे ग्रामस्थांनी कौतुक केले असून, गावकुसाबाहेर जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा व पुढे जाऊन समाजसेवेचा आदर्शमय धडा कापसे कुटुंबीयांनी दिला आहे.


