सुरेश पाचभाई, मारेगाव
बोटोनी : घोडदऱा परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
रात्री अचानक आलेल्या वादळ व पावसामुळे गट क्रमांक 10/2 सह आजूबाजूच्या अनेक शेतशिवारातील उभ्या पिकांवर मोठा परतीचा आघात झाला. विशेषतः कापूस, सोयाबीन, तूर व मका या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके जमिनीवर आडवी पडल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

या अनपेक्षित आपत्तीने शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळाली असून पुढील हंगामासाठी मोठा आर्थिक बोजा निर्माण झाला आहे. हंगामभर घाम गाळून उभे केलेले पीक वादळाच्या एका झटक्यात उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी बांधव सध्या चिंतेत आहेत.
शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. शेतकऱ्यांना मोठा आधार मिळावा व त्यांच्या होणाऱ्या हालांवर त्वरित उपाययोजना व्हाव्यात, यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिक स्तरावर होत आहे.