२७ लाखांहून अधिक मदत मुख्यमंत्री निधीत
सुरेश पाचभाई मारेगाव
यवतमाळ – अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकरी वर्गावर मोठे संकट ओढवले आहे. या कठीण काळात यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत हृदयस्पर्शी पुढाकार घेतला आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. कुमार चिंता यांच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देत यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यमंत्री मदत निधीत तब्बल ₹२७ लक्ष ११ हजार १११ रुपयांचे स्वेच्छा योगदान दिले आहे.

आज दिनांक २९ सप्टेंबर २०२५, सोमवार दुपारी बारा वाजता झालेल्या औपचारिक कार्यक्रमात हा धनादेश माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
यवतमाळ जिल्हा कृषीप्रधान असून, येथे शेतकरी आत्महत्यांचे भीषण चित्र पूर्वीपासून दिसत आले आहे. पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या संघर्षाशी त्यांना जवळून आत्मीयता आहे. म्हणूनच या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

श्री. कुमार चिंता यांनी सांगितले,
“शेतकरी आपल्या समाजाचे आधारस्तंभ आहेत. या संकटाच्या काळात त्यांच्यासाठी आपण उभे राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. यवतमाळ पोलिसांनी दिलेला हा हातभार म्हणजे सहानुभूतीचा आणि कर्तव्यभावनेचा उत्तम नमुना आहे.”
या संवेदनशील कृतीमुळे यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की ते फक्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्यातच नाही तर समाजहिताच्या कार्यातही सदैव आघाडीवर आहेत.