चिमुकल्या कन्येला आईची साथ हरपली : वनरक्षक अंकिता वराटे यांचे दुःखद निधन
सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव : केळापूर तालुक्यातील पांडरकवडा येथे फिरते पथकात कार्यरत असलेल्या तरुण व समर्पित वनरक्षक अंकिता वराटे (पाचभाई, वय २९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने वनविभागासह सर्वत्र शोककळा पसरली आहे.
मुळच्या मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथील असलेल्या अंकिताचा विवाह राळेगाव तालुक्यातील वडकी येथील रुपेश सोमेश्वर पाचभाई यांच्यासोबत झाला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कन्येला जन्म दिला होता. मात्र प्रसूतीनंतर अचानक प्रकृती खालावली.
किडनी लिव्हर निकामी झाल्याने नागपूरमधील खाजगी रुग्णालयात गेल्या पंधरवड्यापासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. परंतु डॉक्टरांचे अथक प्रयत्न व सर्वांच्या प्रार्थना असूनही दिनांक १ ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अनेकांनी उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. तरीही नियतीला अंकिताचे जगणे मान्य नव्हते. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच सामाजिक वर्तुळातही शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी, पती आणि एक चिमुकली कन्या असा परिवार आहे. पार्थिवावर आज बुधवारी (१ ऑक्टोबर) सकाळी ११:३० वाजता त्यांच्या माहेरगावी घोडदरा (ता. मारेगाव, जि. यवतमाळ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.