पांडरकवडा-केळापूर मार्गावरील टोलनाक्याजवळ भीषण अपघात
सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव: पांडरकवडा-केळापूर मार्गावरील टोलनाक्याजवळ घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही हृदयद्रावक घटना काल (१ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.
या अपघातात रोहन चंपत टेकाम (१९, रा. बुरांडा, खडकी ता. मारेगाव) जागीच ठार झाला तर त्याचा मित्र आदित्य विठ्ठल टेकाम (२१, रा. उमरपोड सोनखास फाटा ) गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन हा काकांच्या घरी झुली (पाहपळ, ता. केळापूर) येथे गेला होता. त्यानंतर तो मित्राला घेण्यासाठी पांडरकवडा येथे आला. काम आटोपून दोघेही झुलीकडे दुचाकीवरून परत जात असताना टोलनाक्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक एवढी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ दोघांना पांडरकवडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. पण तेथे उपचारादरम्यान रोहनचा मृत्यू झाला. सध्या आदित्यवर उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून मृत्यूची बातमी समजताच गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पांडरकवडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.