भक्तीभावात दुर्गा देवीचे विसर्जन, जनसागर उसळला!
मारेगाव पोलिसांचा चोख बंदोबस्त
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव : नवरात्रोत्सवाचा समारोप भक्तीभाव, उत्साह आणि जल्लोषात मारेगाव शहरात झाला. शहरातील विविध मंडळांच्या दुर्गा देवींचे विसर्जन दिमाखदार मिरवणुकीत पार पडले. ढोल-ताशा, बँजो आणि डीजेच्या तालावर शहर थरारून गेले होते. “जय माता दी”च्या जयघोषांनी वातावरण मंगलमय झाले.
विसर्जन पाहण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर नागरिकांचा जनसागर उसळला होता. महिला, युवक, आणि लहान मुले मोठ्या उत्साहात सहभागी झाली. मिरवणुकीत एकात्मतेचे दर्शन घडले.
संपूर्ण सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता.
ठाणेदार श्याम वानखडे स्वतः पथकासह रस्त्यावर होते आणि प्रत्येक टप्प्याची पाहणी करत होते.अखेर “येत्या वर्षी लवकर या”च्या घोषात देवीचे विसर्जन करण्यात आले. भक्तांच्या डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर जयघोष – अशा भावनिक वातावरणात नवरात्रोत्सवाचा समारोप झाला.