३०० हून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; इलेक्ट्रिक स्कूटर, स्मार्ट टीव्ही व वॉशिंग मशीनची बक्षिसे वाटप
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव :नवरात्रोत्सवाचा जल्लोष आणि माता जगदंबेच्या साक्षीने मारेगावात रंगला एक अविस्मरणीय डांडिया सोहळा! जनहित कल्याण संघटना, मारेगाव यांच्या वतीने प्रथमच नगरपरिषद प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या भव्य डांडिया महोत्सवाने नगरवासीयांना थिरकवून टाकले.
नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात महिलांचा आणि युवतींचा प्रचंड प्रतिसाद लाभला. दररोजच्या खेळात झोकात नाचणाऱ्या स्पर्धकांना चांदीची नाणी आणि पैठणी साड्यांचे आकर्षक बक्षिस देण्यात आले. नवमीच्या दिवशी कन्या पूजनासह महोत्सवाचा जल्लोषात समारोप झाला.
स्पर्धेच्या निकालात मोना पोटे हिने प्रथम क्रमांक पटकावत इलेक्ट्रिक स्कूटर आपल्या नावावर केली. द्वितीय क्रमांक ज्योत्सना भोगेकर हिच्या नावावर राहिला असून तिला एलईडी स्मार्ट टीव्हीचे बक्षीस मिळाले. तृतीय क्रमांक प्रीती सोनटक्के हिला मिळताच संपूर्ण प्रांगणात टाळ्यांचा कडकडाट झाला, तिला वॉशिंग मशीन भेट देण्यात आले.

समूह ‘ब’ स्पर्धेत अगस्ती कपिल सहारे यांनी प्रथम क्रमांक पटकावून लॅपटॉप जिंकला. परी तेलंग हिला दुसरा क्रमांक व अँड्रॉईड फोन, तर स्वरा रमेश झाडे हिला तिसरा क्रमांक व सायकलचे बक्षीस मिळाले.
या भव्य सोहळ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र पटेल ठाकरे, वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशीष कुलसंगे, टीकाराम कोंगरे, मुख्याधिकारी शशिकांत बाबर, काँग्रेस तालुका अध्यक्ष मारुती गौरकार, नगरसेवक आकाश बदकी, ग्रा.प. संघाचे अध्यक्ष देवेंद्र पोल्हे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराना यांच्या मार्गदर्शनाखाली या डांडिया महोत्सवात लाखो रुपयांची बहुमोल बक्षिसे वाटप करण्यात आली. नगरवासीयांनी या उपक्रमाचे कौतुक करत “मारेगावातला हा डांडिया महोत्सव नव्या उत्साहाचं प्रतीक ठरला” अशा शब्दांत संघटनेचा गौरव केला.