‘बुलेटवरील अधिकारी’ — महिला कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद!

0
1257

आईच्या संघर्षातून घडलेली दीपाली खवले बनल्या मारेगावच्या प्रेरणादायी कृषी अधिकारी

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव: “कष्टाची तयारी आणि आईचे आशीर्वाद असतील, तर यश अटळ आहे,” हे वाक्य सार्थ ठरवत मारेगाव तालुक्यात कार्यरत कृषी अधिकारी दीपाली खवले या आज प्रत्येक शेतकऱ्याच्या हृदयात स्थान मिळवत आहेत.

सरकारी चारचाकी वाहनाची सुविधा नसतानाही त्या सहकार्याच्या बुलेट किंवा इतर बाइक वरून थेट शेतकऱ्यांच्या शिवारात पोहोचतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि तांत्रिक, नाविन्यपूर्ण कृषी सल्ला देतात. त्यामुळे त्यांना आज परिसरात “बुलेटवरील अधिकारी” म्हणून ओळख मिळाली आहे.

दीपाली खवले या नांदेड–परभणी येथील रहिवासी आहेत. वडिलांचे निधन त्या इयत्ता चौथ्या वर्गात असताना झाले. वडील वसतिगृह वॉर्डन म्हणून कार्यरत होते. अचानक वडिलांचा आधार हरवल्यानंतर कुटुंबावर संकट ओढावले. मात्र आईच्या जिद्दीने, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि स्वतःच्या परिश्रमाच्या बळावर दीपालींनी शिक्षण पूर्ण केले.

लातूर येथे ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातून कृषी विषयात युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल प्राप्त केले. शिक्षणानंतर पहिली नेमणूक त्यांची मारेगाव या आदिवासी बहुल तालुक्यात झाली.

अधिकृत चारचाकी वाहन नसतानाही दीपाली खवले यांनी कधीही कर्तव्यापासून पाऊल मागे घेतले नाही. आज त्या दररोज शेतात जाऊन कीडनियंत्रण, नवीन शेती तंत्रज्ञान आणि पिकांचे आरोग्य तपासणी याबाबत थेट मार्गदर्शन करतात.

> “शेतकऱ्यांच्या डोळ्यात समाधान दिसलं की सगळा थकवा नाहीसा होतो,”
—कु.दीपाली खवले, तालुका कृषी अधिकारी

आज दीपाली खवले अनेक तरुणींना प्रेरणा देत आहेत. आईच्या संघर्षातून, कुटुंबाच्या आधाराने आणि स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर त्या आज ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाचं प्रतीक बनल्या आहेत. मारेगावसारख्या आदिवासी बहुल भागात महिला कृषी अधिकारी म्हणून प्रभावी सेवा,अधिकृत वाहनाऐवजी बुलेटवरून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोच,शेतीतील समस्यांवर थेट मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार,आईच्या संघर्षातून घडलेलं यशस्वी व्यक्तिमत्व.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here