निसर्गरम्य निर्गुळा नदीत काकड आरती परंपरेचा आजही ठेवा
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव: तालुक्यातील वेगाव निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आणि संत परंपरेने नटलेले वेगाव हे गाव निर्गुळा नदीच्या तीरावर आपली अध्यात्मिक ओळख आजही जपत आहे. येथे संत सद्गुरू ज्ञानगिरी महाराज यांच्या पावन स्मृती आजही भाविकांच्या हृदयात जिवंत आहेत.
काळाच्या ओघातही अखंड सुरू असलेली काकड आरतीची परंपरा या वर्षी दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार असून, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. पहाटे गावातील भाविक स्नान करून एकत्र फेरी काढतात, रांगोळ्यांनी सजविलेल्या रस्त्यांवरून निर्गुळा नदीपर्यंत काकड सोडण्याचा सोहळा पार पडतो. त्यानंतर ज्ञानगिरी मठात काकड आरती करून कार्यक्रमाची सांगता केली जाते.

परंपरेनुसार श्री योगेश्वर जी कापसे यांच्या हस्ते ‘काकड आरतीचा दिवा’ मंदिरात पाठविण्याची परंपरा आजही जपली जाते.
याचबरोबर संत जगन्नाथ महाराज यांनी स्थापन केलेल्या “सईबाई उत्सव” या वार्षिक कार्यक्रमाचीही परंपरा कायम असून, यंदा १६ ऑक्टोबर २०२५ रोजी हा जागतिक अन्नदान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी गावात मोठ्या प्रमाणावर अन्नदान, भजन-कीर्तन व भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
संत परंपरेचा वारसा, श्रद्धा आणि भक्ती यांचा संगम असलेला हा उत्सव वेगाव ग्रामस्थांसाठी अभिमानाचा सोहळा ठरत आहे.