शेतकऱ्याच्या शेतात सकाळी वाघाचे ठसे दिसल्याने खळबळ – वन विभागाचा तपास सुरू
सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव : तालुक्यातील माहादापेठ (कुंभा) शिवारात आज (सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या शेतात वाघाचे ठसे आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी काही शेतकरी नेहमीप्रमाणे शेतीच्या कामासाठी शेतात गेले असता त्यांना मातीवर वाघाचे ठसे स्पष्ट दिसून आले. त्यांनी तत्काळ गावात येऊन इतरांना याची माहिती दिली तसेच वन विभागालाही कळवले.

वन विभागाला माहिती मिळताच अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ठसे तपासून वाघाच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे.

वन विभागाने ग्रामस्थांना घाबरू नये, परंतु आवश्यक ती सावधानता बाळगावी, असे आवाहन केले आहे. सध्या वाघ त्या भागातच आहे की पुढे निघून गेला आहे, याचा शोध वन कर्मचारी घेत आहेत.

या घटनेमुळे माहादापेठ , आष्टोना,बोरी, दापोरा ,परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांना रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात किंवा जंगलाच्या दिशेने जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.