गणेशपूरात चैतन्य ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळातर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात
विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क डेस्क, वणी
वणी: गणेशपूर “ज्येष्ठांचा सन्मान म्हणजेच संस्कृतीचा अभिमान” या घोषवाक्याला वास्तवात उतरवत, चैतन्य ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ, गणेशपूर यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन बुधवारी (दि. १ ऑक्टोबर २०२५) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात गावातील तसेच परिसरातील ज्येष्ठ मंडळी, माजी सैनिक, समाजकारणी, मान्यवर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी अती ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव, तसेच प्रेरणादायी व्याख्यान अशा विविध उपक्रमांनी वातावरण भारावून गेले.

विशेष म्हणजे, सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त समाजसेविका आणि नूरजहाँ चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव डॉ. राणा नूर सिद्धीकी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर समाजात विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक श्री. विजयराव गंधेवार यांनी ‘अवयवदान व देहदानाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करताना, “मनुष्याने आपल्या शेवटच्या श्वासानंतरही समाजासाठी काहीतरी दिले पाहिजे, ही खरी मानवतेची जाणीव आहे,” असे सांगून उपस्थितांना प्रेरित केले.

आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ‘आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (आभा) कार्ड’ उपक्रमाविषयी माहिती देऊन नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या सोहळ्यात ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जीवनातील संघर्ष, अनुभव आणि आठवणींना उजाळा देताना, “अशा कार्यक्रमांमुळे समाजात नवी ऊर्जा मिळते. आपल्याला मिळणारा हा सन्मान म्हणजे जीवनातील परिश्रमाचे खरे फलित आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.

मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी उत्तम नाश्ता व चहाचीही सोय करण्यात आली होती.
गावात उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा हा कार्यक्रम ज्येष्ठांचा गौरव आणि समाजासाठी जागरूकतेचे व्यासपीठ ठरला.