शेकापूर गावावर शोककळा
ज्ञानेश्वर आवारी, झरी-जामणी
झरी-जामणी : तालुक्यातील शेकापूर येथील शेतकरी गजानन निळकंठ मुसळे (वय ५५) यांचे मंगळवार (७ ऑक्टोबर) रोजी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन मुसळे हे नेहमीप्रमाणे दिवसभर शेतात काम करून रात्री घरी जेवणानंतर विश्रांती घेत होते. दरम्यान, मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांना छातीत वेदना जाणवू लागल्या. त्यांनी तत्काळ ही बाब कुटुंबीयांना सांगितली.
त्यानंतर गावातील शेजारी व नातेवाईक मदतीला धावून आले. तातडीने गाडी बोलावून त्यांना उपचारासाठी वणी येथे घेऊन जाण्याची तयारी सुरू झाली. मात्र, रुग्णवाहिकेतून गावाबाहेर थोड्या अंतरावर जात असतानाच गजानन मुसळे यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांचा मृतदेह घरी आणण्यात आला असून, आज (बुधवार) दुपारी त्यांच्या मूळ गावी शेकापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा आप्तपरिवार आहे.
गजानन मुसळे हे गावातील प्रेमळ, सयमी आणि मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीपिकावर केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. वाढता खर्च, नैसर्गिक आपत्ती, तोट्याची शेती, वाढते कर्ज आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या या कारणांमुळे अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली जीवन जगत आहेत. या परिस्थितीमुळे हृदयविकारासारखे आजार वाढीस लागल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.


