भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसकडून तीव्र निषेध

0
62

दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

ज्ञानेश्वर आवारी, झरी-जामनी

झरी-जामनी: येथे भारताचे मा. सरन्यायाधीश (CJI) भूषण गवई यांच्यावर झालेल्या बुटफेकीच्या घटनेचा झरी काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार मार्फत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

या प्रसंगी माजी आमदार वामनराव कासावार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “ही घटना लोकशाही व्यवस्थेवर आणि भारतीय न्यायसंस्थेवर थेट आघात करणारी आहे. न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेल्या सरन्यायाधीशावर अशा प्रकारे हल्ला होणे हे केवळ व्यक्तिवर नव्हे, तर संविधानावरच प्रहार आहे.”

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय न्यायसंस्था ही लोकशाहीचा एक प्रमुख स्तंभ आहे. अशा प्रकारच्या घटना देशातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. दोषींवर भारतीय दंडसंहिता कलम 124(A) अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली. तसेच, अशा घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली.

निवेदन सादर करताना तालुका अध्यक्ष संदीप बुर्रेवार, राजीव कासावार (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती), प्रकाश कासावार, प्रकाश मॅकालवार, भगवान चुकलवार, नितीन खडसे, हरिदास गुजलवार, गंगाधर आत्राम, आझाद उदकवार, सुरेंद्र गेडाम, भुमारेड्डी बाजन्लावार, नंदू किनाके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here