दुचाकीची दुचाकीला धडक

0
4282

निवृत्त मुख्याध्यापकांचा जागेवरच मृत्यू

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव : बँकेतील काम आटोपून आपल्या घरी परत जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत निवृत्त मुख्याध्यापकांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास 1 ते 1.45 वाजता मारेगाव-वणी रोडवरील सेंट्रल बँक जवळील अर्धसैनिक कॅन्टीनसमोर घडली.

मृत व्यक्तीचे नाव मुकुंद पत्रुजी राजूरकर (वय 60, रा. चोपण, ह. मू. मारेगाव) असे असून ते तीन वर्षांपूर्वी मारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले होते.

सोमवारी ते आपल्या MH 29 BZ 8528 या हिरो स्प्लेंडर दुचाकीवरून आर्थिक व्यवहारासाठी बँकेत गेले होते. बँकेतील काम आटोपून घराकडे परतताना MH 29 BT 5336 या विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात मुकुंद राजूरकर खाली पडले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी तातडीने त्यांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात, त्यानंतर वणी येथील खासगी दवाखान्यात हलविले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

राजूरकर यांच्या निधनाने मारेगाव परिसरात शोककळा पसरली असून, ते शांत, मनमिळावू आणि समाजप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.



अपघातप्रवण ठिकाणांवर उपाययोजनांची गरज

मारेगाव शहरातील राज्य महामार्गालगत बँका, शासकीय कार्यालये, बार तसेच विविध व्यावसायिक स्थळे आहेत. या भागात वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून, भरधाव गतीने वाहन चालवणाऱ्यांमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. याच भागात यापूर्वीही दोन मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.


शाळा-महाविद्यालयाजवळ गतिरोधकांची तातडीची आवश्यकता

अपघातग्रस्त ठिकाणाजवळ हायस्कूल, कॉलेज तसेच बँका असल्याने विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची वर्दळ दिवसभर असते. त्यामुळे शाळा-महाविद्यालयाजवळ तसेच शासकीय कार्यालयाजवळ गतिरोधक बसविण्याची तातडीची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

समाजसेवकांनी याबाबत वारंवार प्रशासनाला पत्र दिले असून, तरीही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दोन जीव गमावल्यानंतरही प्रशासनाला जाग केव्हा येणार, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here