करनवाडी–नवरगाव रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचे अर्धनग्न रस्ता रोको आंदोलन

0
1061

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव:- करनवाडी स्टॉप ते नवरगाव या दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत खराब परिस्थिती आणि मोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार होणारे अपघात, विद्यार्थ्यांना व नागरिकांना होत असणारा प्रचंड त्रास याविरोधात ग्रामस्थांचा आज (३ नोव्हेंबर २०२५, सोमवार) संताप उसळला. करनवाडी येथे दुपारी बारा वाजता ग्रामस्थांनी खड्ड्यामध्ये बसून अर्धनग्न रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती प्रलंबित आहे. करनवाडी, नवरगाव आणि आसपासच्या दहा ते पंधरा गावातील विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि रुग्ण या मार्गाचा वापर करतात. तथापि, प्रचंड खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून अपघातांची संख्या वाढली आहे. याच मार्गावर असलेल्या प्राचीन नृसिंह मंदिर, तुलसा माता मंदिर व नवरगाव धरण येथे जाणाऱ्या पर्यटकांनाही रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पूर्वी ग्रामस्थांनी तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपशाखा अभियंता आणि मारेगाव पोलीस ठाणे यांना संयुक्त निवेदन देऊन रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली होती. तसेच रस्ता दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता.

आजच्या आंदोलनात करनवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. निवेदनावर अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून प्रमुख नागरिकांमध्ये अक्षय ताजने, दीपक राऊत, सागर बदखल, प्रभाकर कोंडेकर यांचा समावेश आहे. आंदोलनात देवा बोबडे आणि इतर ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग होता.

ग्रामस्थांच्या मागणीवर तहसीलदारांनी रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तथापि, शासनाने विलंब न लावता तातडीने रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी नोंदवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here