बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर – युट्युबवरून चोरी करण्याची नवी शक्कल शिकून घरफोडी करणाऱ्या आणि घरमालकाने ओळखल्यामुळे वृद्धाचा हातोड्याने डोक्यात मारहाण करून अमानुष खून करणाऱ्या सराईत आरोपीच्या सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. अजयकुमार गौतम चव्हाण (वय 31 मूळ रा. जामगाव, सध्या रा. लऊळ, ता. माढा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला कर्नाटक राज्यातील वाडी रेल्वे स्टेशनवरून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
नेमकी घटना काय?
माढा तालुक्यातील जामगाव येथे 61वर्षीय अशोक भीमान्ना मुळे हे घरात एकटे होते. तेव्हा अज्ञाताने घरात घुसून त्यांच्या डोक्यात प्राणघातक हत्याराने जबर मारहाण करून त्यांचा खून केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट उचकटून सुमारे 2 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली होती. 25 ऑगस्ट 2026 च्या रात्री 9 ते 26 ऑगस्ट 2026 च्या सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर मृताचा मुलगा विजयकुमार अशोक मुळे (वय 30) याच्या फिर्यादीवरून माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आजी नको म्हणत होती, पण त्यानं मुकबधिर मुलीला घरी नेलं, आधी भयंकर कृत्य, मग… शेवटी सोलापुरात ‘न्याय’ झाला
YouTube वर पाहिली कुलूप उघडण्याची युक्ती
पोलीस तपासात आरोपी अजयकुमार चव्हाण याने धक्कादायक खुलासा केला. तो कर्जाच्या उंबरठ्यावर असल्याने पैशांची प्रचंड गरज होती. चोरी करण्याच्या उद्देशाने त्याने माढा येथील मुळे यांच्या घराच्या पाठीमागील पाईपवरून वर चढून घरात प्रवेश केला. वरच्या खोलीला लावलेले लोखंडी कुलूप उघडण्यासाठी त्याने युट्युबवर पाहिलेल्या व्हिडिओचा वापर केला. सिरेंजच्या साह्याने कुलूपात पेट्रोल टाकून ते पेटवून दिले व कुलूप उघडले.
कपाट उचकटत असताना आवाजाने घरात झोपलेले वृद्ध अशोक मुळे जागे झाले. त्यांनी आरोपी अजयकुमारला ओळखले. त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि ओळख उघड होऊ नये म्हणून आरोपीने सोबत आणलेल्या हातोड्याने अशोक मुळे यांच्या डोक्यात जबर प्रहार केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने मुद्देमाल घेऊन पोबारा केला.
पाठलाग करून कर्नाटकातून अटक
घटनेचे गांभीर्य ओळखून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी तपासासाठी ४ विशेष पथके तयार केली होती. सहा. पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या पथकाने जामगावमध्ये सलग 3 दिवस तळ ठोकून बारकाईने तपास केला.
गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित अजयकुमार चव्हाण याच्यावर संशय बळावला. आरोपी सतत मोबाईल बंद करून पसार होत होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तो कर्नाटकातील कलबुर्गी भागात असल्याचे समजताच, पोनि संजय जगताप यांनी सपोनि विजय शिंदे, सपोफौ नारायण गोलेकर व पथकाला तातडीने तेथे रवाना केले. वाडी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर संशयास्पदरित्या वावरत असताना रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या.
आरोपी अजयकुमार याला ताब्यात घेऊन माढा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास माढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रोहित शिंदे करत आहेत.