बातमी ऐका (Marathi Voice Reader)
वैदेही कर्णिक, प्रतिनिधी, मुंबई: राज्यभरात शनिवारी दणक्यात आणि मोठ्या उत्साहात थरावर थर लावत दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. ‘गोविंदा आला रे आला’च्या गजरात गल्लीबोळांपासून ते मोठ्या मैदानांपर्यंत गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडली. गोविंदांचा उत्साह चांगलाच शिगेला पोहचला असल्याचे दिसून आले. मात्र, या जल्लोषाला मुंबई आणि परिसरात भीषण अपघातांचे गालबोट लागले आहे. मानवी थरांवरून खाली कोसळल्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईत मिळून तब्बल २ गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ३०६ हून अधिक गोविंदा गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत.
नवी मुंबईमध्ये थरावरून अचानक नियंत्रण सुटून खाली कोसळल्याने एका ३४ वर्षीय गोविंदाला आपला जीव गमवावा लागला. याशिवाय मुंबईतही अशाच दुर्दैवी घटनेत एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे.
शासकीय अन् बीएमसी रुग्णालयांची आकडेवारी (रात्री १२ वाजेपर्यंत):
मुंबई महानगरपालिका आणि शासकीय रुग्णालयांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, विविध अपघातांत एकूण ३०६ गोविंदा जखमी झाले. यातील तब्बल २०२ जणांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर ४९ जणांना गंभीर दुखापतींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ५५ गोविंदांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
रुग्णालयातील आकडेवारी…
शहर भाग : १५४ जखमी (२९ दाखल, ३१ उपचाराधीन, ९४ डिस्चार्ज)
पूर्व उपनगर : ५७ जखमी (११ दाखल, ४६ डिस्चार्ज)
पश्चिम उपनगर : ९५ जखमी (९ दाखल, २४ उपचाराधीन, ६२ डिस्चार्ज)
कोणत्या रुग्णालयात सर्वाधिक रुग्ण?
परळच्या केईएम (KEM) रुग्णालयात सर्वाधिक म्हणजेच ५५ जखमी गोविंदांना आणण्यात आले होते, त्यातील १८ जणांना दाखल करण्यात आले. याशिवाय राजावाडी रुग्णालयात २८, नायर रुग्णालयात २५, पोद्दार रुग्णालयात २०, बीडीबीए रुग्णालयात १८, सायन रुग्णालयात १६ तर हिंदुजा रुग्णालयात १४ जखमी गोविंदांवर उपचार करण्यात आले.
नियमांची पायमल्ली….
मुंबईतील नामांकित आणि मोठ्या गोविंदा पथकांच्या देखाव्यातून प्रेरणा घेत अनेक लहान पथकांनीही ८ ते ९ थर रचण्याचा अट्टाहास केला. योग्य सुरक्षेची काळजी न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात येते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट बंदी असतानाही अनेक ठिकाणी थरांमध्ये १४ वर्षांखालील चिमुकल्या मुलांचा वापर सर्रास केला जात असल्याचे चित्र दिसून आले. या धोकादायक खेळाकडे आणि नियमांच्या उल्लंघनाकडे पोलीस प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत दुर्लक्ष करत असल्याचे विदारक चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळाले.