बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर : उपचारासाठी क्लिनिकमध्ये आलेल्या ४५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप डॉक्टरवर करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर या घटनेचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याने महिलेची बदनामी झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. फुलंब्री शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या समर्थ क्लिनिकमधील या कथित प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी फुलंब्री पोलिसांनी २० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास गुन्हा दाखल करून डॉ. रामदास महादू तरटे (वय ५०, रा. फुलंब्री) याला अटक केली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिला डोकेदुखीचा त्रास होत असल्याने ती १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास समर्थ क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेली होती. यावेळी डॉक्टरने तिला औषधी गोळ्या दिल्या. त्या घेतल्यानंतर तिला गुंगी आली. याच अवस्थेत डॉक्टरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
दांडियातील वादातून मित्रानेच केला घात, 20 वर्षाच्या पुष्करचा जीव गेला; लोखंडी रॉडने डोके, चेहरा अन् मानेवर वार, छ. संभाजीनगर हादरलं
लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे व्हिडीओ तयार करण्यात आले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करून आपली बदनामी करण्यात आल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे फुलंब्री पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित डॉक्टरला अटक केली.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान संबंधित पुरावे, डिजिटल स्वरूपातील माहिती आणि इतर अनुषंगिक बाबींची नियमानुसार पडताळणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणखी काही महिलांचे व्हिडीओ प्रसारित झाल्याची चर्चाही शहरात सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे करीत आहेत.