बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर: लेकीला शासकीय सेवेतील अधिकाऱ्याचं स्थळ मिळालं म्हणून आईवडील आनंदात होते. लग्नानंतर मुलीला सुख लागेल म्हणून कर्ज काढून 4 जून 2026 रोजी मोठ्या थाटामाटात विवाह लावून दिला. पण अवघ्या काही दिवसांत वास्तव बाहेर आलं आणि सगळेच हादरले. ज्याला सरकारी अधिकारी समजलं तो बनावट निघाला. आपली फसवणूक झाल्याची भावना आणि त्यात सातत्याने होणारा जाच याला कंटाळून अवघ्या चार महिन्यात एका नवविवाहितेनं मृत्यूला कवटळालं. छत्रपती संभाजीनगरातील एन-13 भागातील वानखेडेनगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.
अवघ्या 23 वर्षीय संजना नीलेश शेजवळ हिनं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. या दुर्दैवी घटनेनं संजनाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बेगमपुरा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी ठाण मांडत पतीसह सासरच्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
नवरात्रामुळे पोटच्या बाळाचा स्पर्श टाळला, मृत्यूनंतर जन्मदात्यांनी नाकारलं, पण ‘त्यांनी’ माणुसकी जपली, छ. संभाजीनगरात काय घडलं? Video
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संजना ही जालना येथील रावसाहेब मगर यांची धाकटी मुलगी. संगणकशास्त्रात डिप्लोमाचं शिक्षण घेतल्यानंतर एखादं चांगलं स्थळ बघून लग्न करून द्यावं, असं कुटुंबीयांना वाटत होतं. तेव्हाच नीलेश शेजवळ याचं स्थळ चालून आलं. नीलेश शासकीय विभागात अधिकारी असल्यानं लेकीला सुख लागेल म्हणून होकार कळवला. मुलीच्या भविष्यासाठी कर्ज काढून वडिलांनी थाटामाटात लग्न लावून दिलं. 4 जून 2026 रोजी हा विवाह सोहळा संपन्न झाला.
सरकारी नोकरी नाहीच
लग्नाला अवघे काही दिवस झाल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आलं. नीलेश याला कोणतीही शासकीय नोकरी नव्हती. वडिलांना खोटं सांगून विश्वास जिंकला. त्यांनी कर्ज काढून लग्न लावून दिलं मात्र त्याच विश्वासाला तडा गेल्यानं संजनाला मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे सासरच्या लोकांकडून तिला वेगवेगळ्या कारणांवरून सतत त्रास देण्यात येत होता, असा आरोपही संजनाच्या नातेवाईकांनी केला आहे.
सततच्या टोमण्यांना कंटाळली
आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर संजना नैराश्यात होती. मात्र, तिनं स्वतःला त्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. तरीही स्वयंपाक, कपडे परिधान करण्याची पद्धत आणि इतर गोष्टींवरून तिला सातत्याने हिणवलं जात होतं. सततचे टोमणे आणि किरकोळ कारणांवरून वाद यांना ती कंटाळली होती. याच मानसिक तणावातून तिनं टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरात आयुष्य संपवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
आईला फोन केला अन्…
दरम्यान, घटनेच्या आदल्या रात्री संजनाने आईला फोन केला होता. पती आणि सासरचे लोक सतत टोमणे मारत असल्याचं सांगून ती ढसाढसा रडली होती. ‘मी आज जेवणार नाही,’ असं सांगूनच तिनं फोन ठेवला. मुलीची अवस्था ऐकून वडिलांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तिला शांत झोप, मी सकाळी येतो, असं सांगितलं. मात्र, दुसऱ्या दिवशी मुलीला भेटायला जाण्याआधीच तिच्या मृत्यूची बातमी आल्याने आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
माहेरच्या मंडळींनी तातडीने जालन्याहून छत्रपती संभाजीनगर गाठलं. रुग्णालयात पोहोचताच पतीसह सासरचे लोक तिथून निघून गेले. त्यानंतर घाटी रुग्णालयात देखील सासरचं कुणीच उपस्थित नव्हतं. त्यामुळे माहेरच्यांचा संताप वाढला. त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी करत बेगमपुरा पोलीस स्टेशन परिसरात ठिय्या दिला. पोलिसांनी संजनाचा मोबाईल जप्त केला असून अधिक तपास सुरू आहे.