बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Pawanraje Nimbalkar Murder Case : काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार व माजी गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांना मोठा दिलासा मिळाला होता. पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी निकाल दिला होता. अशातच आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने उच्च न्यायालयात निर्णयाविरुद्ध आव्हान दिलं आहे.
निकाल कायद्याच्या चौकटीत चुकीचा – सीबीआय
सीबीआयच्या आधी निंबाळकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता सीबीआयने देखील उच्च न्यायलयात धाव घेतल्याने प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. हा खटला मुख्यत्त्वे माफीचा साक्षीदार झालेल्या आरोपीच्या कबुलीजबाबावर आधारित होता. माफीच्या साक्षीदाराने आपला जबाब सातत्याने बदलल्याने विसंगती निर्माण झाल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. विशेष न्यायलयाचा हा निकाल कायद्याच्या चौकटीत चुकीचा असून तो रद्द करण्याची मागणी सीबीआयने केली आहे.
ओमराजेंच्या आईची निर्दोष सुटकेविरुद्ध उच्च न्यायालयात धाव
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याची साक्ष खटल्यात महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून सादर करण्यात आली होती. परंतु, ताब्यात घेतल्यानंतर पारसमल जैन याला 15 दिवस बेकायदेशीर कोठडीत ठेवण्यात आलं होतं आणि त्यांचा तिथं छळ करण्यात आला होता. त्यामुळे, ती संशयास्पद असून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं विशेष न्यायलयाने निकाल देताना म्हटलं होतं. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आई आनंदीदेवी यांनी पाटील यांच्या निर्दोष सुटकेविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेऊन अपील दाखल केली होती.
गुरुवारी सीबीआयच्या अपिलावर सुनावणीची शक्यता
दरम्यान, सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेनंतर आता न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सीबीआयच्या अपिलावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात आता उच्च न्यायालय कोणता निर्णय घेणार? यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.