बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर : शेतजमिनीची वाटणी आणि जमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून नातवाने टोकाचं पाऊल उचललं. ६५ वर्षीय आजीला मारहाण करून तिचा गळा आवळत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड शहरातील यशवंतवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी आजीने दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलिसांनी 20 ऑक्टोबर रोजी रात्री नातवाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणेश संजय सूर्यवंशी असे आरोपी नातवाचे नाव असून, शांताबाई गणपत सूर्यवंशी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, 12 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गणेश याने आजी शांताबाई यांना शेतजमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून जाब विचारला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. गणेश याने आजीला बेदम मारहाण केली. त्यानंतर तारेच्या साहाय्याने तिचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
डोकेदुखीने त्रस्त महिला उपचारासाठी गेली, डॉक्टरने गुंगीच्या गोळ्या दिल्या अन्…, भयंकर कृत्यानं छ. संभाजीनगरात खळबळ
शांताबाई यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. यानंतर गणेश याने पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या धमकीमुळे घाबरलेल्या शांताबाई यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलिसांनी गणेश संजय सूर्यवंशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिल्लोड शहर पोलीस करीत आहेत.