बातमी ऐका (Marathi Voice Reader)
कोल्हापूर: घरात कुणी नसल्याची संधी साधून चुलत दिरानंच महिलेसोबत भयंकर कृत्य केलं. भावजयीला शिवीगाळ करत तिच्यावर हल्ला चढवला आणि धारदार शस्त्राने 16 वार करून खून केला. पन्हाळा तालुक्यातील काखेपैकी शाहूनगर वसाहतीत बुधवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. पूजा अविनाश दाभाडे (वय 32) असं मृत महिलेचं नाव आहे. तर आरोपी चुलत दीर सुरेश मधुकर दाभाडे (वय 38) हा खून करून पळून गेला. याप्रकरणी कोडोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या भयंकर घटनेनं कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.
नेमकं घडलं काय?
पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सुरेश मधुकर दाभाडे हा मृत महिलेचा चुलत दीर आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने पूजाशी गैरवर्तन केले होते. त्याच्या विरोधात कोडोली पोलिस ठाण्यात छेडछाडीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पूजा घरी एकटीच होती. घरात कुणी नसल्याची माहिती घेऊन सुरेश घरी आला आणि दारात येऊन शिवीगाळ सुरू केली. पूजा दारात येताच क्षणाचाही विचार न करता त्याने पूजाच्या हात-पाय आणि पोटावर धारदार शस्त्राने सपासप 16 वार केले.
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! मध्यरात्री 1 वाजता घरी पोहोचले पोलीस; प्रसिद्ध रिलस्टारला घेतलं ताब्यात, प्रकरण काय?
अचानक हल्ला झाल्यावरही पूजाने विरोधाचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी मोठ्याने आरडा-ओरडा केला. मात्र, शेजारचे लोक बाहेर येईपर्यंत आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूजाला नागरिकांनी उपचारासाठी कोडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी सीपीआर कोल्हापूर येथे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिली. परंतु, उपचारादरम्यानच पूजाचा मृत्यू झाला. पूजा हिच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान, आरोपी सुरेश हा खून करून घटनास्थळावरून पळून गेला. याबाबत कोडोली पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक चेतन मसतुगे यांच्या नेतृत्वाखाली व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची अशी दोन पथके आरोपीचा शोध घेत आहेत. तसेच शाहूवाडी विभागाचे पोलिस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.
गुन्हा दाखल केल्याचा राग?
काही काळापूर्वी सुरेश याने पूजासोबत गैरवर्तन केले होते. त्यामुळे पूजाच्या पतीने त्याच्याविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात छेडछाडीचा गुन्हा दाखल केला होता. त्याच रागातून सुरेशने तिच्यावर हल्ला केल्याची चर्चा गावात आहे. मात्र, हल्ल्याचं नेमकं कारण आरोपीच्या अटेकनंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.