बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याची आवक वाढली असून, दरात प्रतिक्विंटल 100 ते 200 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 160 ते 170 गाड्या कांदा बाजारात दाखल झाला. आवक चांगली असूनही मागणी कायम असल्याने दरात वाढ झाली आहे. कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी याबाबत माहिती दिली.
कांद्याच्या दरात वाढ
बाजार समितीत सध्या कांद्याला प्रतिक्विंटल 2500 रुपये ते 5500 रुपये असा दर मिळत आहे. सोलापूर बाजारात प्रामुख्याने अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातून जुन्या कांद्याची आवक होत आहे. हा कांदा सोलापूरच्या बाजारातून खरेदी करून आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या दाक्षिणात्य राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवला जात आहे.
नवीन कांद्याची आवक
बाजारात नवीन पांढऱ्या कांद्याचीही आवक सुरू झाली असून, त्याला प्रतिकिलो 35 रुपये ते 65 रुपये असा दर मिळत आहे. मात्र, नवीन लाल कांद्याची मोठी आवक सुरू होण्यासाठी अजून सुमारे एका महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
भविष्यातील दरांबाबत अंदाज
कांद्याच्या पुढील दरांबाबत बोलताना श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी सांगितले की, मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात कांद्याचे दर 100 ते 200 रुपयांनी वाढले आहेत. येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव आणखी वाढतील की खाली येतील, हे सध्या सांगणे कठीण आहे. पुढील आवक आणि इतर राज्यांमधील मागणीवरच भविष्यातील दर अवलंबून असतील. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत जुन्या कांद्याचे दर टिकून राहतील असा अंदाज वर्तवला जात असून, सध्या मिळालेल्या दरवाढीमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.