बातमी ऐका (Marathi Voice Reader)
हिंगोली : यंदा महाराष्ट्रभरात पावसाने पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी डोळे लावून पावसाची वाट पाहत आहेत. पाऊस नसल्याने हातातोंडाशी आलेली पिकं डोळ्यांसमोर करपून जात आहेत. त्यामुळे वर्षभराचा खर्च कसा भागवायचा, मुलांचं शिक्षण कसं करायचं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. हिंगोली जिल्ह्यातही पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तोंडाशी आलेली पिकं पाण्याअभावी सुकत असून, शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. हिंगोलीतील काही शेतकऱ्यांनी लोकल 18 सोबत संवाद साधत आपली व्यथा मांडली आहे.
हातातोंडाशी आलेली पिकं डोळ्यांसमोर करपली…
महाराष्ट्रातील अनेक जिल्हे सध्या दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करत आहेत. अनेक भागांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस झालेला नाही. एल निनोच्या प्रभावामुळे सध्या पाऊस होण्याची शक्यताही कमी असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. परतीचा पाऊसही कमी होण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी अविनाश आघाव यांनी सांगितलं की, गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतातील सोयाबीनसह इतर उभी पिकं पाण्याअभावी डोळ्यांसमोर जळून जात आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून, सरकारने हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच सर्वसामान्यांनी परिस्थितीचं भान ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि शेतकऱ्यांची परिस्थिती सरकारपर्यंत पोहोचवावी, अशी विनंतीही अविनाश आघाव यांनी केली आहे.
शेतात फक्त पाला उरला…
एकनाथ नागरे आणि गंगाधर घुगे यांच्या शेतात सोयाबीनचं पीक घेतलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाऊस न झाल्याने शेतातील सोयाबीनचं पीक पूर्णपणे जळून गेलं आहे. आता शेतात फक्त पिकाचा पाला उरला आहे. एवढं नुकसान झालं असतानाही अद्याप सरकारकडून कोणीही आमच्या बांधावर पाहणी करण्यासाठी आलेलं नाही, अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी आणि कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.