बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर: एका शेतकऱ्याच्या घरात घुसून त्याच्या पत्नीवर अत्याचार केल्याची भयंकर घटना सोलापुरात घडली. अक्कलकोट तालुक्यात घडलेल्या या प्रकारानंतर आरोपी वैजुनाथ गुरप्पा तिरगुळे (वय 25, रा. घोळसागव) याला पोलिसांनी अटक केली होती. आता या प्रकरणात महत्त्वाचं अपडेट असून आरोपीला कोर्टाने चांगलीच अद्दल घडवली. विशेष न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी आरोपीला 7 वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
नेमकी घटना काय?
पीडित महिला ही तिचा पती, मुलगा, मुलगी व सासऱ्यांसोबत शेतातच वास्तव्यास होती. 10 एप्रिल 2016 रोजी रात्रीच्या सुमारास घरातील सर्वजण झोपलेले होते. तेव्हा, मध्यरात्रीच्या सुमारास पीडितेला अंगावर कोणाचातरी स्पर्श जाणवल्याने ती जागी झाली. त्यावेळी आरोपी वैजुनाथ तिरगुळे हा तिच्या अंगाशी झटापट करत असल्याचे तिला दिसून आले. नराधम वैजुनाथने पीडितेच्या अंगावर नखांनी ओरखडले आणि तिच्या तोंडात साडीचा बोळा कोंबून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.
चल पळून जाऊन लग्न करू, ‘तो’ घरात घुसला अन्… अकरावीत शिकणाऱ्या मुलीचं टोकाचं पाऊल, जालना हादरलं!
पतीचा प्रतिकार व पोलिसांत फिर्याद
पीडितेने आरडाओरड केल्यानंतर घराबाहेर झोपलेला तिचा पती तत्काळ पळत घरात आला. त्याने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, वैजुनाथने पीडितेच्या पतीलाही मारहाण केली आणि तेथून पळ काढला. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 एप्रिल 2016 रोजी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली. फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्वे यांनी करून आरोपी वैजुनाथ तिरगुळे यास अटक केली आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांच्यासमोर झाली. खटल्याचे गांभीर्य लक्षात घेता सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित महिला, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांची साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. शितल डोके यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर आरोपीच्या बाजूने ॲड. विक्रांत फताटे यांनी काम पाहिले. साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी वैजुनाथ तिरगुळे यास दोषी ठरवले आणि 7 वर्षे सक्तमजुरी व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.