बातमी ऐका (Marathi Voice Reader)
कोल्हापूर : कर्जाच्या परतफेडीसाठी खासगी सावकाराकडून सततचा मानसिक त्रास आणि धमक्यांना कंटाळून कोल्हापूरच्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले. मोबाईलवर मेसेज पाठवून पत्नीची माफी मागितली आणि विष पिऊन आयुष्य संपवले. कागल तालुक्यातील सोनगे येथे ही मन हेलावणारी घटना घडली. श्रीधर दत्तात्रय डावरे (वय 47) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पत्नी सविता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुरगूड पोलिस ठाण्यात निवास अण्णासो पाटील (रा. बाणगे) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं घडलं काय?
मृत श्रीधर डावरे यांच्या पत्नी सविता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, श्रीधर याने बाणगे येथील निवास पाटील यांच्याकडून काही वर्षांपूर्वी व्याजाने 9 लाख रुपये घेतले होते. त्यानंतर वेळोवेळी 26 लाख रुपयांची रक्कम परत केली. मात्र, आरोपी पाटील याने आणखी 25 लाख रुपयांची मागणी केली. तसेच या पैशांसाठी शिवीगाळ करत धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप श्रीधर यांच्या पत्नीने केला आहे.
ये बाजूला हो…. मैत्रिणींचा आरडाओरडा पण इअरफोन जीवघेणा ठरला, ट्रेनच्या धडकेत अनुष्का गेली
पत्नीची माफी मागून…
23 सप्टेंबर रोजी श्रीधर याने आपल्या मोबाईलवरून पत्नी सविताच्या मोबाईलवर एक संदेश पाठवला. यामध्ये पत्नी सविता हिची माफी मागून खिशात ठेवलेल्या चिठ्ठीचे दोन फोटो पाठवले. त्यानंतर त्याने विषारी औषध पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबत माहिती मिळताच त्यांना तातडीने निपाणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
निपाणीतून पुढील उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर येथे हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच श्रीधर यांचे निधन झाले. त्यानंतर आरोपी निवास पाटील याच्यावर श्रीधर डावरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी निवास पाटील याच्याविरोधात मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.