बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरील डेटिंगची जाहिरात पाहून ॲप डाउनलोड करणे एका 25 वर्षीय तरुणाला महागात पडल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. डेटिंग ॲपवरून एका महिलेशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र, या संबंधांचे फोटो आणि व्हिडिओ दाखवून तरुणाकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तरुणाने जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, एका महिलेसह तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
शेख आमीन शेख बिलाल (वय 24, रा. मुजीब कॉलनी, रोशनगेट) आणि 40 वर्षीय महिला, तसेच आफताब फिल्म्स या यूट्यूब चॅनलचा मालक तकी हसन खान यांचा या प्रकरणात आरोपी म्हणून उल्लेख आहे. आमीन आणि संबंधित महिलेला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक गणेश ताठे यांनी रविवारी ही माहिती दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.
फिर्यादी 24 वर्षीय तरुण भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. दोन महिन्यांपूर्वी त्याला इन्स्टाग्रामवर एका दिवसासाठी एक रुपयात डेटिंगची जाहिरात दिसली. त्यानंतर त्याने संबंधित लिंकवरून डेटिंग ॲप डाउनलोड केले. यासाठी त्याने ऑनलाइन एक रुपया भरला, तसेच 199 रुपये सर्व्हिस फी दिली. त्यानंतर ॲपवर त्याची मुस्कान (बदललेले नाव) या महिलेशी ओळख झाली आणि दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले.काही दिवसांनी महिलेने तरुणाला मुकुंदवाडी येथे बोलावले. तेथून दोघे शांग्रीला लॉजवर गेले. तिथे त्यांच्या संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर महिला दोन हजार रुपये घेऊन निघून गेली.
या घटनेनंतर 5 सप्टेंबर रोजी तरुणाच्या व्हॉट्सॲपवर शेख आमीन याने शांग्रीला लॉजमधील शारीरिक संबंधांचे फोटो पाठवले. त्यानंतर फोन करून त्याला धमकावल्याचा आरोप आहे. ‘आगे का पिक्चर अभी बाकी है, क्या करने का बोलो’ असे म्हणत त्याने पुढे काय करायचे, याबाबत धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणाने आपल्या चुलत भावाला संपूर्ण घटना सांगितली.
चुलत भावाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार 8 सप्टेंबर रोजी रात्री जिन्सी चौकात चर्चेसाठी आरोपींना बोलावण्यात आले. तेथे आमीन शेख, संबंधित महिला आणि त्यांचे अन्य दोन साथीदार आले. यावेळी त्यांनी तरुणाला शारीरिक संबंधांचा संपूर्ण व्हिडिओ दाखवला आणि दहा लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.या दबावाखाली तरुणाने त्यावेळी एक लाख रुपये रोख दिले. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्याबाबत कबुलीनामा करण्यात आला. याच वेळी 50 वर्षीय महिलेने तिचे खरे नाव सांगितल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
एक लाख रुपये घेतल्यानंतरही आरोपींकडून पैशांची मागणी थांबली नसल्याचा आरोप आहे. 15 ऑक्टोबर रोजी आफताब फिल्म्स या यूट्यूब चॅनलचा चालक तकी हसन याने तरुणाच्या काकांना फोन केला. तुमच्या पुतण्याचा व्हिडिओ आणि संबंधित महिलाही माझ्याकडे आली आहे. त्यांना आणखी पैसे हवे आहेत, असे सांगून त्याने काकांना मजनू हिल येथे बोलावले.काकांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथे तिघे जण आले आणि त्यांनी पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. यावेळी काकांनी जिन्सी पोलीस ठाण्यातच बसून चर्चा करू, असे सांगितले. मात्र, त्यानंतर तकी हसन याने मोबाइल बंद केला आणि तेथून पसार झाला.
वारंवार होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे तरुणाने अखेर जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित प्रकरणात खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. आमीन शेख आणि 40 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात तकी हसन खान याचाही आरोपी म्हणून उल्लेख असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.