मोबाईलसह ११ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; मंगळवार बाजारातील चोरीच्या घटनांवर पोलिसांची करडी नजर
सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव : बसमध्ये चढत असताना प्रवाशाच्या खिशातून मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केल्याच्या संशयावरून मारेगाव पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यातील तरुणांच्या अंगझडतीमध्ये फिर्यादीचा मोबाईल आणि १,१०० रुपये रोख असा एकूण ११ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात कलम ३०३(२), ३(५) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महादेव बापुराव बोंडे (५५, रा. रामेश्वरपोड, ता. मारेगाव) हे ८ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता कुंभा येथे जाण्यासाठी मारेगाव बसस्थानकावर आले होते.
यवतमाळ-वर्धा बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशात कोणीतरी हात घातल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खिशाची पाहणी केली असता ओपो कंपनीचा मोबाईल आणि १,१०० रुपये रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले.
मोबाईल आणि पैसे गायब झाल्याचे लक्षात येताच बोंडे यांनी मागे वळून आरडाओरड केली. त्यानंतर नागरिकांनी चार तरुणांना पकडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि चौघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.
ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे साहिल कैलाश पुरी (२२), नितीन रघुनाथ वाघाडे (२४), लखन विजय चांदेकर (३८) आणि सुमित राजू मानकर (१९) अशी आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, साहिल पुरी याच्या पँटच्या खिशातून फिर्यादीचा सुमारे १० हजार रुपये किमतीचा ओपो मोबाईल, तर सुमित मानकर याच्या शर्टच्या खिशातून १,१०० रुपये रोख मिळून आले.
फिर्यादीच्या जबानीच्या आधारे मोबाईल व रोख रक्कम चोरीच्या प्रकरणात साहिल पुरी आणि सुमित मानकर यांच्यावर आरोप करण्यात आला असून, नितीन वाघाडे व लखन चांदेकर हे त्यांच्यासोबत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, चौघांविरुद्ध पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
मंगळवार बाजारावर पोलिसांची करडी नजर
दरम्यान, मारेगावच्या मंगळवार आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचालींवर तसेच संशयास्पद व्यक्तींवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.
मारेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठेत पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, मोबाईल चोरी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांचे लक्ष केंद्रित झाले आहे. गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्यांना मारेगावच्या बाजारपेठेत थारा मिळणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.
बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनीही मोबाईल, पाकीट व रोख रकमेची काळजी घ्यावी आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जुनेद शेख करीत आहेत. गुन्ह्याची नोंद मपोहेकॉ वीणा तोडासे, मारेगाव पोलिस ठाणे यांनी केली आहे.