बातमी ऐका (Marathi Voice Reader)
कोल्हापूर: इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका 23 वर्षीय विद्यार्थिनीची एका कड्यावरून 1000 फूट खोल दरीत ढकलून हत्या केल्याच्या संशयावरून तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली. श्रीपाद दिनकर वडार असं 25 वर्षीय प्रियकराचं नाव आहे. भुदरगड तालुक्यातील नाईकवाडी परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात प्रियकराच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
श्रीपाद वडार यानं शनिवारी पोलीस ठाण्यात जाऊन इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या तरन्नुम नाईक हिच्या मृत्यूबाबत माहिती दिली थी. त्यानंतर पोलिसांनी एका पथकाला शिवडाव-नायकवाडी परिसरातील दुर्गम भागात तपासासाठी पाठवलं होतं. तेव्हा नायकवाडी धबधब्याजवळील कड्याच्या खाली तरुणीचा मृतदेह आढळला. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी श्रीपाद याला ताब्यात घेतलं होतं.
कॉलेजला जाते म्हणाली अन् बॉयफ्रेंडला भेटायला गेली, 3 दिवसांनी होणार होतं लग्न, कोल्हापूरची इंजिनिअर तरुणी जिवानिशी गेली
एकत्र आयुष्य संपवण्याचा निर्णय पण…
पोलीस चौकशीत आरोपी श्रीपाद याने सांगितले की, “गेल्या साडेपाच वर्षांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. तरन्नुमच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं होतं. त्यामुळे दोघेही अस्वस्थ होते. मग दोघांनी एकत्र आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते कड्याच्या परिसरात गेले. तरन्नुमने उडी मारली, पण ऐनवेळी त्याचे धाडस झाले नाही.”
चॅट हिस्ट्रीमुळं वेगळाच खुलासा
श्रीपाद वडार याने तरन्नुम हिने स्वत:च उडी घेतल्याचं सांगितलं असलं तरी पोलिसांना याबाबत कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. पोलिसांनी दोघांची चॅट हिस्ट्री तपासली असून त्यात आत्महत्येच्या प्लॅनिंगबाबत काहीही मिळाले नाही. तर तरन्नुमचे दुसऱ्या कोणाशी लग्न लावून देत असल्याने श्रीपाद अस्वस्थ होता. हेच त्याच्या मॅसेजवरून दिसून आले. त्यामुळे त्याच्याबाबत संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी तरन्नुम नाईक ही गारगोटी येथे आपल्या आजीसोबत राहात होती. तर श्रीपाद हा देखील गारगोटी येथेच राहातो. त्याचा भाऊ स्थानिक कंत्राटदार असून तो त्याच्यासोबतच काम करतो. आता न्यायालयाने श्रीपादला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पोलिसांनी दोघांचेही मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त केले आहेत. पुढील तपास सुरू आहे.