बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सांगली: खानदेश आणि मराठवाड्यातून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न उराशी घेऊन ईश्वरपुरात आलेल्या दोन विद्यार्थ्यांसोबत हृदयद्रावक घटना घडली. हॉटेलमध्ये जेवण करून बाहेर पडताना समोरच्या उघड्या विहिरीचा अंदाज न आल्याने एकाचा तोल गेला आणि तो थेट विहिरीत पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्राने उडी मारली. मात्र, दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
प्रशांत सुभाष पाटील (वय 25, रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) आणि गंगाधर रमेश सुंकुरवार (वय 24, रा. नांदेड) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोघेही प्रकाश हॉस्पिटल परिसरात राहून एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. सध्या त्यांची इंटर्नशिप सुरू होती. या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Sangli News: लग्न मोडल्याचा राग, वाद मिटवायला बोलावलं अन् मध्यरात्रीच भयंकर थरार, सांगली हादरली!
नेमकं घडलं काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबर रोजी रात्री प्रशांत, गंगाधर आणि त्यांचे मित्र एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यावर ते बाहेर पडले. मात्र, हॉटेलपासून अवघ्या 10 ते 15 फुटांवर असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने प्रशांत चालत-चालतच विहिरीत पडला. त्याला वाचवण्यासाठी गंगाधरने लगेच विहिरीत उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तोही बुडायला लागला.
दोन्ही मित्र बुडत असल्याचे पाहून संकेत मच्छिंद्र उंडे (वय 24, रा. माघापूर, जि. अहिल्यानगर) याने स्थानिकांच्या मदतीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. ईश्वरपूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील अधिक तपास करीत आहेत.
इंटर्नशिप सुरू असतानाच…
प्रशांत पाटील आणि गंगाधर सुंकुरवार हे दोघे एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. दोघांची प्रकाश हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप सुरू होती. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर गावी जाऊन शहरात वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांच्या आई-वडिलांनी देखील लाखो रुपये खर्चून मुलांना शिकवलं. मात्र, या दुर्दैवी घटनेनं सगळं संपलं. मुलांचं आणि आई-वडिलांचंही स्वप्न अधुरं राहिलं.