बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर : आजच्या काळात उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. मात्र, नोकरी न मिळाल्यामुळे निराश न होता जिद्द आणि कष्टाच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील जब्बार अत्तार यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाचा यशस्वी मार्ग निवडला. बीएपर्यंत शिक्षण घेतलेले जब्बार अत्तार आज आपल्या यशाच्या जोरावर परिसरातील इतर तरुणांसाठी एक दीपस्तंभ ठरले आहेत.
जब्बार अत्तार यांनी आपल्या शेतात पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचे गगनाला भिडलेले भाव आणि सेंद्रिय शेतीची गरज लक्षात घेता, त्यांनी बाहेरून खत खरेदी करण्याऐवजी स्वतःच शेळीपालन करण्याचा दूरगामी निर्णय घेतला. या विचारातून त्यांनी अवघ्या 10 शेळ्यांपासून आपल्या शेळीपालनाच्या प्रवासाची सुरुवात केली.
सुरुवातीला घेतलेल्या शेळ्यांपासून मिळालेले मलिदा आणि शेणखत त्यांनी स्वतःच्या शेतात वापरण्यास सुरुवात केली. या सेंद्रिय खतामुळे पिकांची जोमदार वाढ झाली आणि दर्जेदार उत्पादन हाती आले. सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळे बाजारात त्यांच्या शेतमालाला ग्राहकांकडून अतिशय चांगला भाव मिळाला. या यशस्वी प्रयोगानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि हळूहळू आपल्या शेळ्यांच्या संख्येत मोठी वाढ केली. आज त्यांच्याकडे 60 पेक्षा अधिक शेळ्यांचा मोठा गोठा आहे.
सध्या या शेळीपालनाचा फायदा त्यांना तिहेरी मार्गाने होत आहे. शेळ्यांपासून मिळणारे अमूल्य शेणखत ते आपल्या शेतातील जांभूळ, ऊस आणि कांदा या नगदी पिकांसाठी वापरतात, ज्यामुळे खताचा खर्च पूर्णपणे वाचला आहे. याशिवाय, बोकडांच्या विक्रीतून त्यांना घसघशीत आर्थिक नफा मिळत आहे.
ते आपली बोकडे कटिंगसाठी 400 ते 500 रुपये प्रति किलो दराने विक्री करतात. त्यांच्या या दर्जेदार शेळीपालनामुळे सांगली, सांगोला, आटपाडी, मंगळवेढा, पंढरपूर तसेच थेट पुण्याहूनही व्यापारी व ग्राहक बोकड खरेदी करण्यासाठी त्यांच्या शेतात आवर्जून येतात. जब्बार अत्तार यांना दोन महिन्याला 3 ते 3.50 लाख रुपयांचा नफा मिळतो तर वर्षाला 10 लाख रुपयांपर्यंतची नफा मिळत असल्याची माहिती जब्बार अत्तार यांनी दिली.
उच्च शिक्षण घेतले म्हणजे नोकरी मिळालीच पाहिजे असा अट्टाहास न धरता, तरुणांनी निराश न होणे गरजेचे आहे. शेती किंवा शेळीपालनासारख्या व्यवसायात योग्य नियोजन केल्यास नोकरीपेक्षाही कैकपटीने अधिक उत्पन्न मिळवता येते, असा मोलाचा आणि प्रेरणादायी सल्ला जब्बार अत्तार आजच्या तरुण पिढीला देत आहेत.