बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर – शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेकजण नोकरीच्या मागे धावतात. तर काही तरुण मात्र वेगळी वाट निवडतात. सोलापुरातील सांगोल्याच्या एका एअरक्राफ्ट इंजिनिअरने असाच वेगळा पर्याय निवडला. कोंबड्यांसोबत बदकपालन करून तो बक्कळ कमाई करत आहे. विकीराज माने असं या उच्चशिक्षित तरुणाचं नाव असून त्याची महिन्याची कमाई अडीच लाखांच्या घरात आहे. विकीराज याने लोकल18 सोबत बोलताना हाच पैशाचा फॉर्म्युला सांगितला आहे.
विकीराज याने छत्रपती संभाजीनगर येथून ‘एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग’चे शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या शोधात असताना, विकीराजने तात्पुरता पर्याय म्हणून अवघ्या 4 कोंबड्यांपासून कुक्कुटपालन व्यवसायाची सुरुवात केली. आज हाच व्यवसाय त्याच्यासाठी यशाचे शिखर ठरला आहे. सर्व खर्च वजा करून तो महिन्याला 2 ते 2.50 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवत आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून केलं शेळीपालन, शेतकऱ्याची आता वर्षाला 10 लाख कमाई, सांगितला यशाचा मंत्र
कोंबड्यांसोबत पाळले बदक
सुरवातीला नोकरी मिळेपर्यंत लहानशा मोकळ्या जागेत शेड उभारून विकीराजने हा व्यवसाय सुरू केला. पुढे ग्राहकांची मागणी ओळखून त्याने बदक पालनाचीही भर घातली. सुरुवातीला 150 अंड्यांच्या लहान हॅचिंग मशीनवरून पिल्ले तयार करण्यास सुरुवात केली होती. आज त्याच्याकडे 12 हजार अंड्यांची क्षमता असलेली आधुनिक यंत्रणा उपलब्ध आहे.
या व्यवसायाच्या यशात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. डिजिटल मार्केटिंगचा प्रभावी वापर करून विकीराजने आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. आज स्थानिक व्यापारी आणि शेतकऱ्यांसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि इतर राज्यांतूनही त्याच्याकडील कोंबडी व बदकाच्या पिल्लांना मोठी मागणी आहे.
उच्चशिक्षित तरुणांनी नोकरीसाठी संघर्ष करत बसण्यापेक्षा स्वतःचा काही ना काही उद्योग सुरू करून आत्मनिर्भर व्हावे. शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरी मिळवण्यासाठी न करता उद्योजक बनण्यासाठी करावा, असा संदेश विकीराजने दिला आहे.