बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर : पतीचे दारूचे व्यसन, परस्त्रीशी बोलणे, पत्ते खेळणे आणि त्यातून होणारी सततची मारहाण… या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना रांजणगाव शेणपुंजी येथील शिवनेरी कॉलनीत घडली. पतीकडून वारंवार होणारी शिवीगाळ आणि मानसिक छळ असह्य झाल्याने विवाहितेने आधी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर आपल्या चिमुकल्या मुलीला सोबत घेऊन घराच्या गॅलरीतून उडी मारली. 31 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत विवाहिता गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना 1 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता तिचा मृत्यू झाला. सुदैवाने या घटनेत चिमुकलीला गंभीर दुखापत झाली नाही. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
कावेरी ऊर्फ मोनिका दीपक काळे (वय 25) असे मृत विवाहितेचे नाव असून, दीपक भागवत काळे असे तिच्या पतीचे नाव आहे. मोनिकाचा भाऊ भगवान बाबासाहेब शिंगाडे (वय 32, रा. चिंचखेड, ता. अंबड, जि. जालना) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, मोनिकाचा विवाह 2016 मध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील दीपक याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, त्यानंतर दीपकला दारूचे व्यसन जडले. तसेच परस्त्रीशी बोलणे आणि पत्ते खेळण्याची सवय लागली. या कारणांमुळे तो मोनिकाला वारंवार शिवीगाळ आणि मारहाण करू लागला.
पतीकडून होणाऱ्या त्रासाची माहिती मोनिकाने अनेकदा माहेरच्या मंडळींना दिली होती. त्यानंतर तिचा भाऊ, आई-वडील आणि नातेवाइकांनी दीपकची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याला वागणुकीत सुधारणा करण्यास सांगितले. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. दीपककडून मोनिकाला मारहाण करणे आणि मानसिक त्रास देणे सुरूच राहिले.
दरम्यान, 31 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास मोनिकाने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तिने आपल्या लहान मुलीला सोबत घेऊन भाड्याने राहत असलेल्या घराच्या गॅलरीतून उडी मारली. या घटनेत मुलीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, मोनिका गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर घरमालक आणि नातेवाइकांच्या मदतीने तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान 1 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी भगवान शिंगाडे यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पती दीपक काळे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक फुलसिंग गुसिंगे करीत आहेत.