संभाजीनगर महानगरपालिकेत भाजप-शिवसेना युतीचे सत्तावाटप निश्चित झाले असून, भाजपकडून समीर राजूरकर हे महापौरपदी विराजमान होणार आहेत. दरम्यान, शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ यांना पुन्हा एकदा उपमहापौरपदाची संधी देण्यात आली आहे. अतुल सावे म्हणाले की, राज्यात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामधील सरकार आहे. याच गोष्टीचा विचार करत मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शहराचा विकास करावा यादृष्टीने आम्ही भाजप-शिवसेना एकत्र काम करत आहे. संभाजीनगरच्या विकासासाठी आम्ही काम करत आहोत. दोन्ही पक्ष शहराच्या विकासासाठी कटीबद्ध आहोत. भाजपतर्फे महापौरपदासाठी समीर राजूरकर यांना संधी देण्यात आली आहे. त्यांना मनपामध्ये काम करण्याचा अनुभव आहे ते चांगले काम करू शकतील. तर उपमहापौर म्हणून शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना आमच्यासोबत केंद्रात आणि राज्यात सोबत सरकारमध्ये आहे. शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे.
एकत्र काम करण्याची भूमिका- शितोळे भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे म्हणाले की, तिकीट वाटपापासूल मी सांगत होतो की आम्ही मैत्री पूर्ण लढत आहोत. हिंदुत्त्वाच्या भूमिकेवर आम्ही एकत्र आलो आहोत. राज्यात अन् शहरात एकत्र काम केले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. यात भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उहापौर होणार आहे. युती करणारच होतो. कारण विकासाची कामे करत असताना दोघांनी सोबत कामे केली तर शहर विकसित करू शकू. पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही काम करू आणि शहर चांगले करण्याासाठी आम्ही काम करत राहू. भाजप मोठा भाऊ हे आम्हाला मान्य- पारकर शिवसेनेचे विलास पारकर म्हणाले की, महायुतीमध्ये भाजप आमचा मोठा भाऊ आहे तर शिवसेना छोटा भाऊ आहे हे आम्ही मान्य केले आहे. हिंदुत्व आणि विकासाचे राजकारण करण्याची आमची भूमिका आहे. मनपाचे निवडणूक ही कार्यकर्त्यांची होती. महायुतीमध्ये काही वाद नाही. मनपावर कायम भगवा राहणार. गोविंद केंद्रे भाजपचे गटनेते महानगरपालिकेच्या निवडणुकीत 57 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सत्तावाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाने ओबीसी प्रवर्गातील निष्ठावंत कार्यकर्ते प्रा. गोविंद केंद्रे यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. दिग्गज नेत्यांमुळे होती रस्सीखेच छत्रपती संभाजीनगर शहरात मंत्री, खासदार आणि आमदार हे दिग्गज नेते आहेत. त्याशिवाय जालना लोकसभा मतदारसंघातील काही भागही शहरात आहे. तेथील आजी-माजी लोकप्रतिनिधींचा मनपामध्ये प्रभाव आहे. या नेत्यांचे समर्थक महापालिका निवडणुकीत विजयी झाले आहेत. आपापल्या समर्थकाची वर्णी महापौरपदी लागावी यासाठी नेते प्रयत्न करत केले. यानंतर समीर राजूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
