माजी खासदार, माजी कुलगुरू आणि प्रख्यात विचारवंत डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे आज सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अभ्यासू, परखड आणि परिवर्तनवादी विचार मांडणारे नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. 11 नोव्हेंबर 1934 रोजी जन्मलेल्या डॉ. वाघमारे यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी स्वतःला समर्पित केले. शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्य अभ्यासक म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठाचे ते संस्थापक आणि पहिले कुलगुरू होते. विद्यापीठाची पायाभरणी, शैक्षणिक रचना उभारणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा ठरवणे या सर्व प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली करण्यामागे त्यांचे दूरदृष्टीपूर्ण योगदान होते. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. डॉ. वाघमारे यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळगाव कवठा, ता. औसा, जि. लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिक्षण, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. लेखनात अभ्यासपूर्णता आणि स्पष्ट मांडणी साहित्य क्षेत्रातही त्यांनी मोलाचे कार्य केले. निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्य चळवळीवर त्यांनी सखोल संशोधन केले आणि लेखनाद्वारे आपली भूमिका मांडली. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांचा पुरस्कार त्यांनी सातत्याने केला. त्यांच्या लेखनात अभ्यासपूर्णता आणि स्पष्ट मांडणी यांचा संगम दिसून येतो. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक आणि समाजचिंतक यांच्यात त्यांना विशेष मान्यता मिळाली. काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर राजकीय क्षेत्रातही डॉ. वाघमारे सक्रिय होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर निवडून गेले होते. राज्यसभेतील त्यांच्या कार्यकाळात शिक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर त्यांनी प्रभावी मते मांडली. तसेच लातूर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. सार्वजनिक जीवनात त्यांनी स्वच्छ प्रतिमा आणि अभ्यासू नेतृत्व यांचा आदर्श ठेवला. लातूर पॅटर्नचे जनक म्हणूनही ओळख शिक्षण क्षेत्रात देशभर प्रसिद्ध असलेल्या ‘लातूर पॅटर्न’चे जनक म्हणूनही त्यांची ओळख आहे. निकालाभिमुख अभ्यासपद्धती, शिस्तबद्ध अध्ययन आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाची संकल्पना त्यांनी लातूरमध्ये रुजवली. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली आणि लातूरचे नाव देशभर गाजले. आजही ‘लातूर पॅटर्न’चा उल्लेख आदराने केला जातो, त्यामागे डॉ. वाघमारे यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन होते. शिक्षण, राजकारण, समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला- मुख्यमंत्री विद्वत्ता, तत्वनिष्ठ आणि, लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या माजी खासदार प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, प्रा. डॉ. वाघमारे यांचा इंग्रजी भाषा आणि साहित्यासह अर्थशास्त्र, राज्यशास्त्राचा गाढा अभ्यास होता. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अध्यापन आणि प्रशासन या अंगाने मोठा ठसा उमटवला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी प्रभावी कार्य केले. विशेष म्हणजे त्यांनी लातूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्षपदही भुषविले. या काळात त्यांनी शहराच्या विकासासाठी लातूर व्हिजन म्हणून आराखडा तयार केला. शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा तसेच नागरी सुविधांसाठी प्रयत्न केले. त्यामुळे लातूरला तत्कालीन संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात प्रथम पुरस्कार देखील मिळाला होता. राज्यसभा सदस्य म्हणूनही त्यांनी विविध संसदीय समितीवर काम केले. लातूरचे किल्लारी भूकंपशास्त्र संशोधन आणि नांदेड – किनवटच्या आदिवासी संशोधन आणि अभ्यास केंद्रांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. त्यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात भारताचे प्रतिनिधी मंडळाचा सदस्य म्हणून म्हणणे मांडण्याची संधी मिळाली होती. त्यांनी वैविध्यपूर्ण विषयांवर विपुल साहित्य निर्मिती केली. त्यांची ही ग्रंथसंपदा आपल्या सर्वांसाठी एक प्रकारचे संचित आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे. ही सामाजिक क्षेत्राची हानी आहे. आम्ही वाघमारे कुटूबिंयाच्या दुःखात सहभागी असून, ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करतो असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, माजी कुलगुरू, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
